कोटा – करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. सर्वच वयोगटातील रुग्णांना करोनामुळं आपला प्राण गमवावा लागत आहे. एका महिला आयुष डॉक्टरचा नुकताच करोनाने मृत्यू झाला आहे. २५ दिवसांपूर्वीच या महिला डॉक्टरने एका बाळाला जन्म दिला होता. या घटनेनं संपूर्ण कुटुंब हादरून गेलं आहे. कोटा येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
डॉ. कृष्णा मीणा (वय 34) असं या महिला डॉक्टरचं नाव आहे. तर त्यांचे पती डॉ. कमल मीणा (एमडी मेडिसिन) अंटा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये कार्यरत आहेत. मीणा यांना आधीची एक तीन वर्षाची मुलगी आहे. गेल्या महिन्यात 19 एप्रिल रोजी एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे मीणा यांनी दुसऱ्या अपत्याला जन्म दिला होता. मात्र रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर घरी परत येताना त्यांना ताप आला होता.
दरम्यान मीणा यांची तपासणी केली असता त्यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला. तर त्यांचा सीटी स्कोअर 17 होता. त्यांना त्वरित वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना सात दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली होती. मात्र अचानक तब्येत बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.