कृष्णेची निवडणूक पुढे ढकलावी; पुरोगामी समविचारी पक्ष संघटनांची मागणी

  • विनोद मोहिते
    इस्लामपूर – सांगली आणि सातारा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कोरोना प्रादुर्भाव कमी होई पर्यत पुढे ढकलावी अशी मागणी कारखाना कार्यक्षेत्रातील पुरोगामी समविचारी पक्ष संघटनांनी केली आहे.

कोरोना संकट आणि कृष्णा कारखाना निवडणुकी संदर्भात आज रविवारी इस्लामपूर येथे संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. शेकाप, मानवाधिकार पार्टी, श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी),स्वाभिमानी पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

देशभर कोरोनाची महामारी सुरू आहे. दोन्ही जिल्ह्यामध्ये संकट कमी होईपर्यंत प्रशासनाने निवडणूक पुढे ढकलावी असे आव्हान दोन्ही जिल्ह्याचे प्रशासन, पालकमंत्री आणि या निवडणुकीसाठी सज्ज असणाऱ्या सर्व पॅनेल प्रमुखांना करण्यात आली आहे. गतवर्षी मे-जून महिन्यात होणारी ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. वर्षभरानंतर आतां पुन्हा निवडणूक प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर गतीमान होत आहे.

कराड, वाळवा,कडेगाव,खानापूर तालुक्यात कारखान्याचे सुमारे चाळीस हजार पात्र सभासद आहेत. निवडणुका नेहमी चुरशीच्या होतात. सभासदांशी संपर्कात राहण्यासाठी सर्वच पॅनेल प्रमुखांचा प्रयत्न असतो.तो या कोरोनाच्या काळात घातक ठरू शकतो. कारखाना स्थापनेपासून असणारे सभासद वयोवृद्ध आहेत. त्यांच्या जीविताला कोरोनाकाळात धोका निर्माण होऊ शकतो.

सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत. दोन्ही जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत आहे. पश्चिम बंगाल,तामिळनाडू, केरळ येथील निवडणुकीनंतरची परिस्थिती काय झाली ? तेथे लोकांची हालअपेष्टा झाली. तसेच पंढरपूर पोटनिवडणूक व गोकुळ दूध संघाची निवडणूक याचा अनुभव पाहता कोरोना आपत्तीमध्ये निवडणूक घेणे चुकीचे,अन्यायकारक व क्रूरतापूर्ण ठरेल. यामुळे कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी. उत्तर प्रदेशातील पंचायत समिती निवडणुकीनंतर झालेली अवस्था भयंकर आहे. आतां कृष्णाकाठाला गंगा काठ करू नका म्हणजे झाले.

एका बाजूला प्रशासन अनेक निर्बंध घालून कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात प्रशासनाला सर्व कोरोना नियमावलीचे पालन करणे शक्य असलेल्या निवडणुकीच्या सारख्या कार्यक्रमात अडकवणे योग्य नाही. दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी जनतेला हे घातक ठरेल. एकाबाजूला लोकशाहीचा हक्क नाकारणारे निर्बंध,ज्यात संचारबंदी, जिल्हाबंदी, सर्व प्रकारच्या व्यवसाय बंदी, सर्व कार्यक्रमांवर निर्बंध असताना सभासदांवर निवडणूक लादणे हे त्यांच्या जीवित व लोकशाही हक्कांना मारणारे ठरेल.

या मागणीच्या निवेदनावर निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर, शेकापचे सरचिटणीस शरद पाटील, मानवाधिकार पार्टीचे अनिल माने,श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादीचे कॉम्रेड धनाजी गुरव, कॉम्रेड दीपक कोठावळे, शेकापचे प्रा.एल. डी. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव, सागर रणदिवे, जयकर पवार,श्रमिक मुक्ती दलाचे कॉम्रेड दिग्विजय पाटील, विजय कुंभार,विशाल मदने यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.