#Corona_Virus : पुण्यात लस निर्मिती सुरू

सहा महिन्यांत सुरू होणार प्रायोगिक चाचण्या

पुणे – “करोना विषाणूवर औषधी आणि लस निर्माण करण्याचे प्रयत्न अनेक देशांत युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचबरोबर, आहे त्या औषधांच्या पुरवठ्याचे व्यवस्थापन सुरू आहे. करोना विषाणूवर लस निर्माण करण्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधील संशोधन आणि विकास विभागाने यावर काम सुरू केले आहे, असे इन्स्टिट्यूटचे आयात-निर्यात विभागाचे संचालक पी. सी. नंबियार यांनी सांगितले.

मराठा चेंबरने आयोजित केलेल्या पुणे इंटरनॅशनल बिजनेस समिटमध्ये नंबियार म्हणाले, “आम्ही अमेरिकेतील एका कंपनीच्या सहकार्याने करोनावर लस निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. चीनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीची व्याप्ती पाहिल्यानंतर लगेच हा निर्णय घेतला. क्‍लिनिकल ट्रायलनंतर विविध देशांत चाचण्या घेतल्यानंतर 2022 पासून ही लस अंतिम स्वरूपात उपलब्ध होईल. जागतिक लसीकरणामध्ये सिरम इन्स्टिट्यूटने सिंहाचा वाटा उचलला आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने वेळोवेळी घेतली आहे.

विशेष म्हणजे, येथे तयार झालेल्या लसी या जागतिक दर्जाच्या असूनही त्याचे दर अत्यल्प असतात. त्यामुळे गरीब देशातील लसीकणाला फायदा होतो. सध्या इन्स्टिट्यूटच्या हडपसर आणि परिसरातील उत्पादन केंद्रात दिवसाला तब्बल 10 लाख डोस तयार करण्यात येतात. इन्स्टिट्यूटचे काम पाहून बिल अँड मेलिंडा गेट्‌स फाउंडेशनसह अनेक जागतिक संस्थांनी विविध पातळ्यांवर इन्स्टिट्यूटसोबत करार केल्याचे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.