कोपरगाव -करोनाच्या लढाईत आपण सदैव जनतेच्या व प्रशासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहून सहकार्य करावे. नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची घरोघरी जाऊन कुटुंबाची तपासणी करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आ. काळे यांच्यावतीने संरक्षक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आ. काळे म्हणाले, कोपरगाव शहरात करोनाबाधित महिला रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे नागरिकांना करोनापासून दूर ठेवण्यात यश मिळाले आहे.आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मदतीने घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे शहरात देखील कोपरगाव नगरपरिषदेला प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे.
आमदार निधीतून 500 पीपीई किट, तीन हजार एन-95 मास्क, तीन हजार ट्रिपल लेअर मास्क, 42 थर्मामिटर, 180 एमएलच्या तीन हजार हॅंडसॅनिटायझर बाटल्या व पोलिसांसाठी 100 फेस शिल्ड मास्क आदी साहित्याचा समावेश आहे. सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाटे, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रुग्णालयाचे डॉ. सचिन उंडे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे उपस्थित होते.