महाराष्ट्र ‘दीन’ नव्हे… झुंजतो आहे

राज्य स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होताना “करोना’शी लढा; पारंपरिक कार्यक्रम रद्द

कोंढवा – दि. 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि पहिली ते आठवी तसेच अकरावीतील विद्यार्थ्यांसाठी गुणपत्रिका आणि गुणगौरव सोहळा असतो. वर्षभर विविध क्षेत्रांत कर्तृत्व मिळविलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पदक देऊन तसेच गुणवंत कामगारांना राज्य शासनाकडून पुरस्कार देऊन गौरविले जाते.

सन्मान सोहळा, पोलिसांची परेड, शाळा-महाविद्यालायतील विद्यार्थ्यांची एनसीसी, स्काऊटची परेड अशा अनेकविध कार्यक्रमांची रेलचेल या दिवशी असते. ही परंपरा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून अखंड सुरू आहे. मात्र, यावर्षी करोना व्हायरसच्या संसर्गामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरी करोनाशी सुरू असलेली महाराष्ट्राची झुंज हाच मोठा सोहळा असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र दिनाच्या म्हणजे 1 मे रोजी विद्यार्थ्यांचा “निकाल’ असतो. वर्षभर केलेल्या अभ्यासाचे फलित निकलारूपी हातात येणार असते, त्यामुळे उत्सुकता, भीती, चिंता अशा संमिश्र भावना त्यांच्यात निर्माण झालेल्या असतात. मात्र, यंदाचे वर्ष या परिस्थितीला अपवाद ठरले आहे. परीक्षाच झाली नसल्याने 1 मे या दिवशी निकालाची नसली तरी वाढत्या करोनाची चिंता आहे.

करोना व्हायरस संसर्गाचे संकट जगभर असल्याने यंदा प्रथमच परीक्षा रद्द करून शाळांना मार्च महिन्यातच सुट्ट्या जाहीर केल्या गेल्या. अन्यथा, दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असतात व 1 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येतो. सकाळी शाळेत जाण्याची घाई, त्यानंतर वर्गशिक्षकांनी दिलेले निकाल, मित्र-मैत्रिणींमध्ये त्याविषयी होणारी चर्चा, कमी गुण मिळाले तर, काहींचा रडवलेला चेहरा याच दिवशी पाहायला मिळतो. गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेत जशी शाबासकीची थाप मिळते तसेच कर्तव्यदक्ष पोलीस, गुणवंत कामगार यांनाही याच दिवशी राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात येते; परंतु यावर्षी करोनामुळे महाराष्ट्र दिन केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात ध्वजारोहण होऊन साजरा होणार आहे. कोणत्याही ठिकाणी कार्यक्रम घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अशी स्थिती असली तरी आजच्या दिवशी अखंड महाराष्ट्र करोनाशी लढतो आहे. यातूनच महाराष्ट्रदिनी आपलीही अखंडता दिसून येत असल्याची भावना अनेक जण व्यक्त करीत आहेत.

कार्यक्रमांना परवानगी नाही…
महाराष्ट्र राज्य स्थापनेला दि. 1 मे 2020 रोजी 60 वर्षे पूर्ण होत असताना करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन मे पर्यंत लॉकडाऊन लागू असल्याने यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करावा, अशा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय वगळता खासगी ठिकाणी कोठेही ध्वजारोहण करू नये, कवायतींचे आयोजन करण्यात येऊ नये, लोक एकत्र येतील असे सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.