संगमनेर -करोनाबाधित रुग्ण सापडण्याचा तालुक्यातील सीलसीला कायम आहे. आज पुन्हा तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील नायकवाडपुरा भागातील एका 59 वर्षीय इसमासह घुलेवाडी येथील 48 वर्षीय व जोर्वे येथील 45 वर्षीय इसमाला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. जोर्वे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे गाव असून, आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या आता 87 वर पोहोचली आहे.
संगमनेर शहरातील नायकवाडपुरा भागातील कन्टेन्मेंट झोनमध्ये असलेल्या एका 59 वर्षीय इसमाला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर सध्या घुलेवाडीच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जोर्वे येथील 45 वर्षीय इसमाच्या रूपाने जोर्वेमध्येही करोनाचा शिरकाव झाला आहे. सदरचा इसम शेतकरी असून, त्याचे टोमॅटो मार्केटला जाणे-येणे होते, अशी माहिती समोर येत आहे.
त्यातूनच त्याला बाधा झाल्याची शक्यता आहे. घुलेवाडीतील व्यक्ती फिजिओथेरपीस्ट असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज संगमनेर तालुक्यात एकाच वेळी तीन रुग्ण आढळल्याने एका दिवसाच्या विश्रांतीनंतर तालुक्याचा आकडा 87 वर गेला.