श्रीगोंदा -कर्जत, श्रीगोंदा, आष्टी तालुक्यांना वरदान ठरलेल्या निमगाव गांगर्डा येथील सीना मध्यम प्रकल्पात कुकडीच्या चालू आवर्तनातून शुक्रवारी (दि. 19) दुपारी भोसे खिंडीद्वारे पाणी सोडण्यात आले.
घोगरगाव येथील चारीत पाणी आल्याचे पाहून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. घोगरगावचे माजी सरपंच डॉ. दिलीप भोस व ज्येष्ठ नेते पांडाभाऊ उगले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी श्रीगोंदा तालुका विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्ष अदिल शेख, सौरभ वाळके, प्रशांत भोस, संकेत उगले, शुभम शिंदे, संकेत जंजीरे, प्रदीप वाल्हेकर, चैतन्य उल्हारे व शेतकरी पुत्र उपस्थित होते.
कुकडीच्या चालू आवर्तनातून सीना धरणात 50 दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार आहे. त्यात संभाव्य गरज पाहून हे पाणी वाढविण्यात येणार आहे. श्रीगोंदा, कर्जत तालुक्यांत अजून मोठा पाऊस झाला नसल्याने खरिपातील पेरणी झालेल्या पिकांना कुकडीच्या पाण्याने मोठा दिलासा मिळणार आहे.