कोपरगाव – कोपरगाव शहरातील आयशा कॉलनीतील एका 58 वर्षांच्या महिलेसह करंजी येथील 50 वर्षांच्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे अहवाल आले आहेत. करोनामुक्त तालुक्यात एकाच दिवशी दोन करोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
करोना महामारी संकटात कोपरगाव तालुका करोना मुक्त असल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असताना पुन्हा एका 50 वर्षीय व्यक्तीला व 58 वर्षांच्या महिलेला करोनाची लागण झाल्याने तालुक्यासह शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे व वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर, संतोष विधाटे यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील करंजी येथील एक 50 वर्षांची व्यक्ती ही नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आरोग्य विभागात काम करणाऱ्या मुलाकडे गेल्या आठवड्यात भेटण्यासाठी गेली होती. तेथे या व्यक्तीस करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याच्या स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
कोपरगाव तालुक्यातून चांदवडला जाण्यापूर्वी करोनाची कोणतीही लक्षणे या व्यक्तीला दिसत नसताना अचान करोनाची लागण कशी झाली, याचा शोध प्रशासकीय यंत्रणा घेत आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या करंजी येथील चौघांना वैद्यकीय विभागाने तपासणीसाठी क्वारन्टाईन केले असून, नाशिक जिल्ह्यातून कोपरगाव तालुक्यात करोना विषाणूचा शिरकाव होणार नाही, याची विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे. बाधित व्यक्तीवर सध्या चांदवड येथे उपचारार सुरू आहेत.
दरम्यान, शहरातील संजयनगर येथील 58 वर्षीय करोनाबाधित महिला ही दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथे जावून आली होती. त्यानंतर बाधित महिलेस घसा व छातीत त्रास होवू लागला. दरम्यानच्या काळात औरंगाबाद येथील मुलगी व जावई या महिलेस भेटून गेल्यानंतर अधिक त्रास जाणवू लागला. त्यानंतर बाधित महिलेची कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली असता, न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे नातेवाईकांनी घशाचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याच्या खासगी प्रयोग शाळेत पाठविले होते.
त्यात संबंधित महिला करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेच्या संपर्कातील सात व्यक्तींना क्वारन्टाईन करण्यात आले असून, बाधित महिलेवर उपचार सुरू आहे. दरम्यान, करोनामुक्त असलेला कोपरगाव तालुका पाहुणचारामुळे बाधित होत आहे. बाधित रुग्ण हे शेजारच्या तालुक्यात व जिल्ह्यात जावून आल्याने व तेथील नातेवाईक आल्याने त्यांना करोनाची लागण झाल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे.