नवी दिल्ली – जगाला पुन्हा एकदा करोनाने धडकी भरवण्यास सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. चीन नंतर आता देशात ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये करोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 सबव्हेरियंटचा शिरकाव झाला असून, BF.7 चे चार रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. अश्यातच, आता भारतीय लष्करानेही अलर्ट जारी केला आहे. भारतीय लष्कराने सर्व सैनिकांना करोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच जवानांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. या संदर्भातील एक ट्विट देखील त्यांनी सोशल मीडियावर केलं आहे.
A close watch is being kept on the evolving epidemiological situation in the country and Indian Army: Indian Army advisory on the rise of #COVID19 cases across the world including China, USA, Japan pic.twitter.com/9sr1Pt7Q9r
— ANI (@ANI) December 23, 2022
जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, लक्षणे असलेल्या जवानांची करोना चाचणी केली जाणार आहे. जे जवान पॉझिटिव्ह आढळून येतील त्यांना सात दिवस क्वारंटाईन केले जाईल तसेच कोणताही आजार असल्यास जवानांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले जाणार आहे. असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.