मांजरी – आता मी कंटाळलो, फार सहन होत नाही. माझ्यावर सतत अन्याय होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालय वारंवार पत्रव्यवहार करून माझ्यावर दबाव आणून त्रास देत आहे. गेली अनेक वर्षे मी न्यायासाठी धावाधाव करत आहे. मला न्याय मिळावा यासाठी न्यायालयात दावा देखील दाखल केला आहे. त्याचा निकाल मिळण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम व भूमी अभिलेख विभाग माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणत आहे. कुठूनही मला न्याय मिळत नाही, असे सांगत निराश झालेले मांजरी बुद्रुक येथील शेतकरी विनय बाळासाहेब घुले यांनी आत्मदहन करून जीवन संपवण्याचा इशारा दिला आहे.
हडपसर- मांजरी बुद्रुक प्रजिमा ५६ रस्त्यावर मांजरी बुद्रुक रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. सन २००४ मध्ये मांजरी बुद्रुक सर्वे नंबर १३ मधील शेतकरी विनय बाळासाहेब घुले यांची ७ गुंठे जमीन संपादित करण्यात आली आहे.परंतु, त्यावेळी भूसंपादन केलेल्या जमिनीचा दिलेला मोबदला योग्य नसल्याचे लक्षात आल्याने तो विनय घुले यांनी अद्यापही स्विकारला नाही.
दरम्यान विनय घुले यांनी सन २०१९ मध्ये आपल्या संपूर्ण शेतजमीनीची सरकारी मोजणी करून घेतली आहे. त्या मोजणीत घुले यांचे ७ गुंठे पेक्षा अधिक ३ गुंठे शेत संपादित झाल्याचे दिसून आले. कोणत्याही स्वरूपात मोबदला स्वीकारलेला नसतानाही १० गुंठे शेतजमीन ताब्यात घेण्यात आल्याने घुले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, भूसंपादन विभाग व संबंधित विभागांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भूमी अभिलेख कार्यालय यांनी भूसंपादन करण्यासाठी नुकतेच हद्दी कायम करून घेतल्या आहेत. त्यानुसार पाहिले तर सुमारे १८ ते १९ गुंठे शेत उड्डाणपूल बांधकामासाठी संपादित केले जाईल, अशी भीती विनय घुले यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान भूमी अभिलेख कार्यालयाने निश्चित केलेल्या हद्दीत काम करत असताना घुले यांच्याकडून मज्जाव करत असल्याचे सांगून पुन्हा काम करण्यास मज्जाव केल्यास शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या संदर्भात कारवाई करण्यात येईल, अशा स्वरूपाचा पत्रव्यवहार सार्वजनिक बांधकाम विभागाने विनय घुले यांच्याशी केला आहे.
भूसंपादन केलेला सविस्तर अहवाल द्यावा,तसेच सरकारी नकाशा प्रमाणे माझी शेतजमीन मोजणी करून त्यात शासनाने संपादित केलेल्या आणि उरलेल्या माझ्या क्षेत्राच्या हद्दी दाखवून माझ्या सातबारा प्रमाणे शेतजमीन दाखवावी आणि शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार संपादित क्षेत्राचा मोबदला मिळावा.असे न करता माझ्या शेतजमीन हद्दीत काम सुरू केल्यास उपअधीक्षक भूमी अभिलेख व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना जबाबदार धरून मी आत्मदहन करेल.
– विनय बाळासाहेब घुले,शेतकरी, मांजरी बुद्रुक
येथील ७ गुंठे जमिनीचे भूसंपादन केले आहे. त्याच्या हद्दीही निश्चित केल्या आहेत. त्या हद्दीतच काम करण्यात येत आहे. संपादित हद्द सोडून शेतकरी विनय घुले यांच्या हद्दीत आम्ही काम करत नाही. त्यामुळे त्यांनी येथील कामात अडथळा निर्माण करू नये.
– अजय भोसले,कार्यकारी अभियंता- सार्वजनिक बांधकाम (दक्षिण)विभाग