चिंता वाढवणारी बातमी! राज्याला आता करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका

केंद्रीय पथकाने दिला इशारा

अमरावती – करोना साथीवर नियंत्रणासाठी सर्व नागरिकांकडून नियमांचे पालन होणे आवश्‍यक आहे. त्याचे पालन न झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सगळीकडे मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता या नियमांचे पालन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य पथकाने दिले.

करोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य पथकाने आज सुपर स्पेशालिटी रुग्णालय स्थित जिल्हा कोविड रुग्णालयाची पाहणी केली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. अमितेश गुप्ता व डॉ. संजय राय यांचा या पथकात समावेश आहे. तत्पूर्वी त्यांनी प्रशासनाकडून करोना उपाययोजनांबाबत बैठकीद्वारे माहिती घेतली.

करोना साथीच्या नियंत्रणासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. नागरिकांकडून कोविड ऍप्रोपिएट बिहेवियरचे काटेकोर पालन होणे आवश्‍यक आहे. मास्क हे करोना टाळण्यासाठीचे सर्वोत्तम औषध आहे. दक्षता त्रिसूत्रीबाबत वारंवार सूचना देत राहाव्यात. दक्षता त्रिसूत्री ही जीवनशैलीचा भाग व्हावी. प्रशासन व आरोग्य यंत्रणा सांघिक भावनेतून करोना नियंत्रणासाठी काम करत आहे. असेच टीमवर्क ठेवावे, असे निर्देश पथकाने दिले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी करोना उपाययोजनांत कार्यान्वित झालेली रुग्णालये, विलगीकरण केंद्रे, ग्रामीण भागातील व्यवस्था, ऑक्‍सिजन व्यवस्था, लसीकरण आदी विविध बाबींची माहिती पथकाला दिली. पथकाने जिल्हा कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील स्टाफशी चर्चा केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.