पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. मात्र लसीचा साठा उपलब्ध नसल्याने तूर्त उद्या शुक्रवारी (दि. 9) महापालिकेची सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत आहेत, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या 59 लसीकरण केंद्रामार्फत सुमारे 1 लाख 80 हजार 92 व्यक्तींना लस देण्यात आले आहे तर खाजगी 28 लसीकरण केंद्रामार्फत 50 हजार 777 व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरातील एकूण 2 लाख 30 हजार 869 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीचा साठा प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू असून साठा उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण केंद्र नियमित वेळेत सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.