मुंबई : औरंगाबाद येथे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी सध्या सुरु असून या सभेला मोठी गर्दी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या सभेसाठी स्टेजवर बसणाऱ्या व्यक्तींना कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. केवळ मुख्यमंत्री वगळता इतर सर्वांना ही टेस्ट बंधनकारक करण्यात आली असून औरंगाबाद पोलिसांनी आमदार अंबादास दानवे यांना यासंदर्भांतील पत्र पाठवले आहे.
दरम्यान राज्यासह औरंगाबादमध्ये देखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या जिल्हाभरात १३ सक्रिय रुग्ण आहेत. तरी कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता मास्क वापराने आणि कोरोनाच्या पंचसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान काही वेळातच सुरु होणाऱ्या या सभेसाठी एकूण ५९ जणांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे , आंबादास दानवे , मंत्री अब्दुल सत्तार यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र स्टेजवर जाणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरच त्यांना आजच्या सभेसाठी स्टेजवर जाता येणार आहे.