कोपरगाव -करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कोपरगाव येथे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता करोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना पुढील उपचार घेण्यासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आजमितीला एकही करोनाबाधित अथवा संशयित रुग्ण नाही. तरी देखील संभाव्य धोका टाळण्यासाठी तहसीलदार योगेश चंद्रे, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर व तालुका आरोग्याधिकारी डॉ. संतोष विधाते यांच्या सहकार्याने करोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या कामाची तीन टप्प्यांत विभागणी करण्यात आली असून, यामध्ये ताप उपचार केंद्र, संशयित कक्ष व विलगीकरण कक्षाचा समावेश असणार आहे.
ताप उपचार केंद्रामध्ये सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. सारी किंवा करोना सदृश आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांना संशियत कक्षात दाखल करण्यात येणार आहे. या संशयीत कक्षामध्ये रुग्णांच्या घशातील स्त्राव घेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली असून, रुग्णांचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविला जाणार आहे. ज्या रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह येतील, अशा रुग्णांवर उपचार करून त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
जर एखाद्या रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला व त्या रुग्णामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळल्यास त्याच्यावर कोपरगाव येथेच उपचार केले जाणार आहेत. मात्र ज्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे असतील, अशाच रुग्णांना पुढील उपचारासाठी नगरला शासकीय रुग्णालयात पाठवले जाणार आहे.