अकलूज -अकलूज शहरातील हॉस्पिटलमध्ये माळशिरस तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी शासनाच्या आरोग्य योजना तीन हास्पिटलमध्ये सुरु आहेत. या हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांना ठेवण्यात येऊ नये, अशी मागणी या ठिकाणी इतर आजारासाठी येणाऱ्या नागरिकांमधून होत आहे.
महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना अकलूज शहरातील एका हॉस्पिटलमध्ये डायलीसीस युनिट आहे. या ठिकाणी चार पाळीत 30 ते 35 रुग्ण डायलीसीस साठी येत असतात. या हॉस्पिटलमध्ये जागा अत्यंत अपुरी आहे. दुसरे जुन्या बसस्थानकाजवळील हॉस्पिटल मध्ये ही योजना सुरु आहे. येथे अत्यंत गरीब रुग्ण येत असतात. तीच परिस्थिती बायपासलगतच्या हॉस्पिटलची आहे. येथे अपघाती रुग्ण दररोज येत असतात. तिथेही जागा कमी व रहदारी कायम असते. या हॉस्पिटलमध्ये करोना रूग्ण शासनाने दाखल केल्यास त्याची लागण झपाट्याने वाढेल हे मात्र नक्की.
खरे तर शासनाने गर्दीच्या ठिकाणी करोना बाधित रूग्णांची सोय करणे करोना प्रसार वाढण्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. यासाठी तालुका, जिल्हा प्रशासनाने तोडगा काढण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
या ठिकाणी करोना रूग्ण ठेवण्यास परवानगी आहे. सरकारच्या नियमानुसार शासकीय अधिकारी, सरकार जसे सांगेल त्या पद्धतीनेच काम करावे लागेल. त्याप्रमाणेच आम्हाला त्या ठिकाणीच रूग्णांची सोय करावी लागेल.
– राम सातपुते, आमदार माळशिरस.
मुलीच्या डायलीसीससाठी आठवड्यातून दोन वेळा मी येथील हॉस्पिटलमध्ये येत असतो. परंतु येथे शासकीय योजना सुरु असल्यामुळे सरकार येथे करोनाचे पेशंट दाखल करणार आहे. शासनाने याबाबत विचार करावा कि या ठिकाणी डायलिसीस रूग्णांची संख्याही जास्त असते. या ठिकाणी करोना रूग्णांची सोय न करता इतरत्र करावी.
– विजयकुमार भोसले, नागरिक