करोनाचा हवेतील संसर्गाविरोधात मास्क प्रभावी शस्त्र; मात्र वॉल्व्ह असलेले मास्क…

डॉ. शेखर मांडे यांचे मत

नवी दिल्ली – करोना विषाणूचा हवेतून संसर्ग होऊ शकतो. करोनाबाधित रुग्ण खोकल्यास किंवा शिंकल्यास विषाणूचा हवेतून प्रसार होईल. त्यासाठी मास्कच प्रभावी आहे, असे सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी म्हटले आहे. तसेच वॉल्व्ह असलेले मास्क धोकादायक असून ते न वापरण्याचा सल्लाही डॉ. शेखर मांडे यांनी दिला आहे.

जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनचा फायदा खूप झाला. अमेरिका, ब्राझील, रशियामध्ये ज्या वेगाने करोनाचा संसर्ग झाला, तेवढा आपल्या लॉकडाऊनमुळे भारतात झाला नाही. लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे संसर्ग वाढणार हे निश्‍चितच होते. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी त्याविरोधात उपयोगी ठरू शकतील. यासाठी सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे मास्कचा वापर करावा. करोनापासून दूर राहण्यासाठी मास्क हे प्रभावी शस्त्र आहे, असे डॉ. मांडे यांनी सांगितले.

सप्टेंबर महिन्यात करोनावरील लस येईल, असे वृत्त होते. या लसीची प्रक्रिया मोठी आहे. त्यासाठी बराच वेळ लागतो. जगभरात यावर काम सुरू आहे. क्‍लिनिकल ट्रायलमध्ये अमेरिकेतील मॉडर्ना, ऑक्‍सफर्डची लस, चीनमधील लसीची चाचणी ऍडव्हान स्टेजमध्ये आहे. मात्र डिसेंबर-जानेवारीपर्यंत लसीची वाट पाहावीच लागणार आहे. जगात लस कुठेही बनली, तरी भारतीय कंपन्या त्या आपल्याला उपलब्ध करून देतील, असेही डॉ. मांडे म्हणाले.

हवेतून करोनाचा संसर्ग होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी म्हटले आहे. याविषयी डॉ. मांडे म्हणाले की, आपण जेव्हा बोलतो, शिंकलो किंव खोकलो तर आपल्या नाका-तोंडातून काही कण बाहेर पडतात. करोनाबाधित बोलताना, खोकताना किंवा शिंकताना त्याच्या नाका-तोंडातून बाहेर पडलेले कण हवेत तरंगतात. हे कण इतरांच्या नाका-तोंडात गेले तर त्यांनाही करोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे खोल्या बंद नसाव्यात, अंतर ठेवावे.

वॉल्व्ह असलेले मास्क धोकादायक
वॉल्व्ह घातलेला व्यक्ती संरक्षित असतो. पण इतर लोकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जर करोनाबाधिताने वॉल्व्ह असलेला मास्क घातला असेल तर त्याच्या श्वासातून विषाणू बाहेर पडू शकतात. त्यामुळे वॉल्व्ह असलेला मास्क वापरू नये असे म्हणतात. डॉक्‍टरांनी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी एन-95 मास्क वापरले तरी चालतील. पण सामन्यांनी तीन-चार थर असलेले मास्क वापरणे उत्तम आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.