तीन महिन्यांत तब्बल रु. 160 कोटींचा; आणखी खर्चाची शक्यता
पुणे – शहरात करोना नियंत्रणासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी पालिकेने आतापर्यंत तब्बल 150 ते 160 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. विशेष म्हणजे, हा खर्च महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या तीन मासिक वेतनांएवढा असल्याची माहिती समोर आली आहे. हा खर्च करतानाच पालिकेकडून जुलै अखेरच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
मागील तीन महिन्यांत पालिकेचा सर्वाधिक खर्च आरोग्य विभागावर झाला आहे. त्यातही खासगी रुग्णालयांची बिले तसेच विलगीकरण कक्षातील सुविधांसाठी खर्च करावा लागला आहे. शहरात करोनाबाधितांचा आकडा 14 हजारांच्या घरात गेला आहे. त्यामुळे महापालिकेने सुरुवातीपासून शहरात करोना नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. त्यात, प्रामुख्याने संशयितांसाठी विलगीकरण सुविधा, आरोग्य विभागासाठी अत्यावश्यक साहित्य खरेदी, औषध फवारणी, घरोघरी सर्वेक्षण, रुग्णांची वाहतूक, विलगीकरण कक्षातील नागरिकांसाठी दररोज जेवणाचा खर्च, अन्य साहित्य व विद्युत यंत्रणा उभारणी अशा खर्चांचा यात समावेश आहे.
आयुक्तांच्या अधिकारात हे साहित्य घेण्यात आले असून, त्यासाठी आतापर्यंत सुमारे 160 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. दरम्यान, संसर्गाचे प्रमाण कसे असेल त्या अंदाजानुसार आणखी 100 कोटी रुपये खर्चाची शक्यता आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
रुग्णालयांची बिलेच सर्वाधिक
महापालिकेने शहरातील 10 रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून घोषित केली आहे. येथील रुग्णांच्या उपचाराचा खर्च केंद्राने ठरवून दिलेल्या दराच्या बिलांनुसार दिला जातो. या एकूण खर्चात सर्वाधिक सुमारे 30 कोटी रुपयांचा खर्च यासाठी झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालयांसाठी तातडीची साहित्य खरेदी, विलगीकरण कक्षात दररोज 7 ते 8 हजार जणांचे जेवण, तसेच बाधितांच्या वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. दरम्यान, या खर्चासाठी पालिकेने राज्यशासनाला साकडे घातले असून, 150 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.