- रॅकेटची शक्यता : निगेटिव्ह रुग्णास पॉझिटिव्ह सांगून दबाव आणण्याचा प्रयत्न
पिंपरी – नगरसेविकेच्या पतीने महापालिकेच्या रुग्णालयात करोनाची तपासणी केली. मात्र त्यांना निगडीतील एका खासगी रुग्णालयात फोन आला. तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगत खासगी रुग्णालयात उपचारासाठी बोलविले. नगरसेविकेच्या पतीने याबाबत महापालिकेच्या डॉक्टरांकडे विचारणा केली असता तुमचा रिपोर्ट अद्याप आलेला नसल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी महापालिकेकडून आलेला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले.
महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी केल्यावर रुग्णांचे मोबाइल क्रमांक खासगी रुग्णालयात जातातच कसे, असा सवाल भाजप नगरसेविका कमल घोलप आणि प्रा. उत्तम केंदळे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.
भाजप नगरसेविका कमल घोलप यांचे कुटुंबीय यापूर्वी करोना बाधित असल्या समोर आले होते. त्यांनी घरीच उपचार घेतले. दोन दिवसांपूर्वी कमल घोलप यांच्या पती आणि त्याचं तीन डॉक्टर मित्रांनी महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालयात करोनाची चाचणीकरिता पुन्हा स्वॅब दिले. त्याचा अहवाल येणे बाकी होते.
दरम्यानच्या काळात निगडीतील एका नामांकित खासगी रुग्णालयाकडून घोलप यांना फोन आला. त्यात तुमचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. तसेच खासगी रुग्णालयात उपचाराकरिता भरती होण्यास सांगितले. याबाबत घोलप यांनी महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांकडे विचारणा केली. मात्र तुमचा अहवाल अद्याप आलेला नसल्याचे सांगितले. मग निगडीतील खासगी रुग्णालयाकडे चाचणी करुन घेणाऱ्यांचे मोबाइल नंबर कसे पोहोचले याबाबत विचारणा करण्यात आली.
बुधवारी सायंकाळी घोलप आणि त्यांच्या तीन मित्रांचा करोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. मग खासगी रुग्णालयाने त्यांना पॉझिटिव्ह असल्याचे कसे सांगितले ? तसेच तपासणी केलेल्या रुग्णांचे मोबाइल क्रमांक खासगी रुग्णालयाकडे कसे गेले, असा सवाल घोलप यांनी उपस्थित केला आहे.
करोना चाचणी करणारे आणि खासगी रुग्णालयाचे एक रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप नगरसेविका घोलप यांनी केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी नगरसेविका कमल घोलप आणि प्रा. उत्तम केंदळे यांनी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची भेट घेऊन त्यांना चौकशी करण्यासाठी निवेदनही दिले आहे.
करोनामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. आपले कुटुंबीय पॉझिटिव्ह आले होते. 22 दिवसानंतर महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी केली असता खासगी रुग्णालयाकडून पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचे सांगितल्यामुळे पतीला मानसिक धक्का बसला असून पुन्हा ते आजारी पडले आहेत. रुग्णांची फसवणूक करणाऱ्यांची चौकशी करून हे रॅकेट उद्धवस्त केले पाहिजे.
– कमल घोलप, भाजप नगरसेविका