अंजली खमितकर
पुणे -करोनावरील उपचार म्हणून “डीआरडीओ’ ने विकसित केलेले “2-डीओक्सी-डी-ग्लुकोज’ (2-डीजी) या पावडरीचा पुण्यात दोन करोना बाधितांवर प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग “सपोर्टिव्ह’ (ऍडोन) म्हणून करण्यात आला.
या पावडरीला आपत्कालीन वापरासाठी “ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ (डीसीजीआय) यांनी परवानगी दिली असून, डॉ. रेड्डीज लॅबोरोटरीज लि.’ यांना व्यापारी निर्मितीसाठी परवानगी दिली आहे.
करोनावर अद्याप नेमके औषध सापडले नाही. त्यात वापरलेली औषधोपचार पद्धती वापरली ती “सपोर्टिव्ह’च होती, असे वैद्यकीय क्षेत्रात मानण्यात येते. त्यातच “डीआरडीओ’च्या “2-डीजी’ या पावडरीचा समावेश आहे. बाधिताला फुफ्फुसाचा संसर्ग होऊन ऑक्सिजन पातळी खालावली असेल, त्याला ही पावडर योग्य मात्रेत पाण्यात मिक्स करून दिल्यास त्याचा त्याला उपयोग होतो, असा दावा “डीआरडीओ’ने केला होता. त्याला आरोग्य मंत्रालयानेही मंजुरी दिली होती.
करोनाबाधितांवर उपचार करताना एकच कॉंक्रीट उपचार अद्याप सापडला नाही. यामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन्स, प्लाझ्मा यासारख्या अन्य उपचार पद्धती वापरण्यात आल्या, त्या पूर्ण उपचार पद्धती आहेत, असे या घडीला म्हणता येणार नाहीत.
त्यावर अद्याप संशोधन सुरू आहे. मात्र, यामध्ये अनेक संस्था सध्या संशोधन करत आहेत आणि त्यातून जी उपचार पद्धती बाहेर येत आहे त्याचा प्रयोग रुग्णांवर केला जात आहे, त्यामुळे त्याला “पूरक’ असा शब्द वापरणे योग्य ठरेल, असे डॉ. अभ्यंकर म्हणाले. वास्तविक या पावडरीचा उपयोग “कॅन्सर’ रोगावरील उपचारात केला जातो.
पुण्यात वापर
पुण्यातही पूना हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांना ही पावडर देण्यात आली. डीआरडीओमध्येच कार्यरत असणाऱ्या एका रुग्णाला ती पावडर उपलब्ध करता आल्याने त्याच्यावर याचा प्रयोग करण्यात आला. अर्थात, अन्य औषधांसोबत ही पावडरही त्यात देण्यात आली. तो रुग्ण करोनातून पूर्णपणे बरा झाल्याची माहिती पूना हॉस्पिटलमधील फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. नितीन अभ्यंकर यांनी दिली.