बीजिग- चीनमध्ये करोनाची साथ पुन्हा वाढायला लागल्याची लक्षणे दिसायला लागल्यामुळे आता नागरिकांनी घरातच रहावे यासाठी ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. चीनच्या दक्षिणेच्या ग्वांगझू शहरामध्ये लोकांना घराघरात ठेवण्यासाठी आणि बाहेर जाणाऱ्यांना मास्क घालायला लावण्यासाठी 60 ड्रोन तैनात केले आहेत.
चीनमधील करोनाची साथ आता बहुतांश आटोक्यात आली असल्याचा दावा केला जात आहे. मात्र तरीही ग्वांगझू शहरामध्या अतिशय घातक डेल्टा व्हारियंटचा प्रादुर्भाव असल्याची लक्षणे आढळून येत आहेत. हा व्हेरियंट सुरूवातीला भारतात आढळून आला होता.
मागील 24 तासांमध्ये ग्वांगझूमध्ये 6 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे या शहरातील नवीन रुग्णांची संख्या 100 झाली आहे.
ड्रोनद्वारे नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येते आहे. दाट लोकवस्तीच्या भागामध्ये नागरिकांच्या प्रवासावर देखरेख, तापमान, विलगीकरण आणि निरोगी आरोग्याची खात्री पटवण्यासाठी मोबाईलचा वापर देखील केला जातो आहे.