मुंबई – नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे एनसीबी अधिकाऱ्यांनी यावेळी थेट एका बेकरीवर छापा टाकला. या छाप्यात बेकरीमधून 160 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एनसीबीने पहिल्यांदाच अशा ड्रग्ज बेकरी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
मुंबईच्या मालाड येथील एका बेकरीतून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची गुप्त माहिती एनसीबी अधिकाऱ्यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी सापळा रचत ही कारवाई केली. अधिकाऱ्यांनी संबंधित बेकरीत थेट छापा टाकला. यावेळी एका डब्ब्यात अधिकाऱ्यांना 160 ग्रॅम गांजा मिळून आला. बेकरीतील कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
संबंधित बेकरीतून केक आणि पेस्ट्रीद्वारे हाय प्रोफाईल परिसरातील नागरिकांना ड्रग्ज पुरवठा केला जात होता. एनसीबी अधिकाऱ्यांनी बेकरीतील सर्व ड्रग्ज ताब्यात घेतले. तसेच बेकरीतील तिघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास अधिकारी करत आहेत. तसेच या कारवाईतून ड्रग्ज माफियांच्या आणखी मोठ्या जाळ्याचा भंडाफोड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, एनसीबीने दोन दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील विदेश डाक कार्यालयात मोठी कारवाई केली होती. या कारवाईत एनसीबीने सुमारे 2.2 किलो गांजा जप्त केला होता. विशेष म्हणजे तो गांजा कॅनेडाहून मुंबईत पार्सलद्वारे पाठवण्यात आला होता. हे पार्सल नेमक कुणासाठी होते याचा तपास सध्या एनसीबी अधिकारी करत आहेत.