कोरोना कॉल सेंटर आता २४ तास – महापौर मोहोळ

बेड्सची उपलब्धता जाणून घेण्यास मदत होणार

पुणे (प्रतिनिधी) – कोरोना संसर्ग वाढत असताना रात्री-अपरात्री कोरोना उपचारासाठी बेड्स उपलब्धतेची माहिती मिळाली यासाठी कॉल सेंटरचे विस्तारीकरण केले असून आता कॉल सेंटरवर कोरोना संदर्भातील माहिती २४ तास मिळणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले.

कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होणे सोपे व्हावे, या अनुषंगाने कोरोना कॉल सेंटरचा आढावा महापौर मोहोळ यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या भेटीवेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘कोरोना कॉल सेंटर २४ तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन यातील हेल्पलाईन क्रमांकाची संख्या दुप्पट केली जात आहे. यात आधी ५ हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध होते, ते आता दहापर्यंत वाढवण्यात येत आहेत. त्यामुळे कॉल कनेक्ट होण्यास अडचण निर्माण होणार नाही’, असेही मोहोळ म्हणाले.

पुणे महानगरपालिका तयार करणार ५ हजार सीसीसी बेड्स !

पुणे शहरातील कोरोनाची एकूण स्थिती पाहता खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेड्सची उपलब्धता आणि भविष्यातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची गरज, यावर सविस्तर आढावा महापौर मोहोळ यांनी घेतला.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘८० टक्के बेड्स ताब्यात घेतल्यानंतर जवळपास ७००० हजार बेड्स कोविडसाठी उपलब्ध होणार आहेत. शिवाय महापालिकेने सीसीसीचे ५ हजार बेड्स तयार करण्याचे नियोजन केले असून पैकी १ हजार २५० बेड्स उपलब्ध झाले आहेत. शिवाय १ हजार ४५० बेड्सची तयारी सुरु आहे’.

डॅश बोर्ड अद्ययावत ठेवणे आणि गरजूंना कमीत कमी वेळेत बेड उपलब्ध करुन देण्यासंदर्भात महापौर मोहोळ यांनी प्रशासनाला सूचना केल्या. शिवाय लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून व्यापकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासही महापौरांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.