वॉशिंग्टन – करोनाच्या साथीचा उगम शोधणाऱ्या चीनी सहकाऱ्यांसह जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने हा आपला पहिलाच प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. तर अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांनी या पथकाच्या निष्कर्शावर शंका व्यक्त केली आहे. त्याच वेळी चीनने मात्र आपण करत असलेल्या सहकार्याची आरोळी ठोकली आहे.
या पथकाचे प्रमुख पीटर बेन एम्बारेक यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने 28 लाख लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आणि जागातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेला ग्रहण लावणाऱ्या या साथीच्या उगम शोधण्याचा प्रयत्न केला. यात करोनाचा विषाणू वटवाघळात आणि खवले मांजरासारख्या अन्य एखाद्या प्राण्यातून माणसांत संक्रमित झाला असण्याची शक्यता व्यक्त केली.
त्याच वेळी प्रयोगशाळेतून या विषाणूचा संसर्ग बाहेर झाला असावा, ही मांडणी पूर्णपणे फेटाळून लावली. हा अहवाल मंगळवारी औपचारिकपणे प्रकाशित करण्यात अला. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सर्व गृहितके अद्याप खुली असल्याचे जाहीर केले आहे.
हा अभ्यास प्रकाशित झाल्यानंतर अमेरिकेसह अन्य डझनभर देशांनी त्यातील निष्कर्शावर चिंता व्यक्त केली. त्याला झालेला विलंब आणि आणि नमुने आणि तपशीलाचा अभाव यावर चीनचा नामोल्लेख टाळून बोट ठेवत टीका केली. त्यावर चीनने या प्रश्नाचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट केले. व्हाईट हाऊसचे माध्यम प्रमुख जेन साकी म्हणाल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा बायडेन प्रशासन अद्याप अभ्यास करत आहे.
मात्र, त्यात महत्वाचा तपशील आणि माहितीचा अभाव आहे, ती मिळवण्यात आली नाही. तसेच त्यात पारदर्शकतेचा अभाव आहे. या अहवालात या साथीचा जगावर झालेल्या परिणामांचा उल्लेख नाही. त्यामुळेच याबाबत अतिरिक्त पुढील पावले उवलण्याची मागणी आम्ही करत आहोत.पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आम्हाला या साथीविषयी आठ नऊ महिन्यांपुर्वी जी माहिती होती. त्यात हा अहवाल कोणतीही भर घालत नाही.
याशिवाय 14 देशांच्या स्वतंत्र निवेदनाविषयी अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने माहिती दिली. त्यात, तज्ज्ञांच्या दुसऱ्या टप्प्यातील पाहणीची मागणी आम्ही करत आहोत. मानवात प्राण्यातून संक्रमित झाल्याच्या निष्कर्षापुर्वी त्याबाबतचा आणखी तपास करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ही साथ संपवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ आणि त्यांचे कर्मचारी अथक परिश्रम करत असल्याचे कौतुक त्यांनी केले आहे. मात्र, हा अभ्यास करण्यास लक्षणीय विलंब झाला आहे. त्यात पूर्ण आणि मूळ तपशील आणि नमुन्यांचा अभाव आहे. पास्की म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य विभागाशी चीन पारदर्शीपणाने वागत नाही.
चीन सरकारवरील अमेरिकेतील टीकाकारांनीही या मुद्द्यावरून चीनवर टीकेची झोड उठवली आहे. या पथकातील सदस्यांना चीनमध्ये येऊ देण्यास खूप वेळ वाट पहायला लावली. वुहानमध्ये ही साथ पसरल्यानंतर वर्षभरापेक्षा अधिक काळानंतर ही पाहणी करण्यात आली. या अभ्यासाला उशीराने सुरवात केल्याबद्दल वाटणाऱ्या चिंतेमध्ये युरोपीयन युनीयननेही आपला सूर मिसळला आहे. तज्ज्ञांच्या पथकाची उशीराने केलेली नियुक्ती, नमुना आणि तपशीलाची मर्यादित उपलब्धता याकडे त्यांनी अंगुलीनिर्देश केले. मात्र, त्याच वेळी पहिले पाऊल म्हणून हा अहवाल उपयुक्त असल्याचे नमूद केले आहे.
चीनी मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवरून चीन सरकारने जागतिक आरोग्य संघटनेला केलेल्या सहकार्यचा उल्लेख केला आहे. या पथकाच्या कामासाठी चीनच्या पथकाने पूर्ण सहकार्य केले. सर्व सुविधा देऊ केल्या. खुलेपणा, पारदर्शकता आणि जबाबदार व्यवहार ठेवल्याचे नमूद केले.
चीनवर या मुद्द्यावरून सातत्याने टीका करून या मुद्द्याचे राजकारण करण्यात येत आहे. या साथ प्रतिबंधक सहकार्याकडे नि:पक्षपातीपणाने न पाहिल्याने अधिक नागरिकांची प्राणहानी झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्याच बरोबर या साथीच्या उगम शोधण्यासाठी अनेक देशांत त्याचा तपास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.