भुवनेश्वर (ओडिशा) – ओदिशामध्ये आयएनएस चिल्का येथे शुक्रवारी अग्निवीरांच्या तिसऱ्या तुकडीचे दीक्षांत संचलन आयोजित करण्यात आले होती. सूर्यास्तानंतर झालेल्या या समारंभात नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत 396 महिला अग्निवीरांसह एकूण 2,630 अग्निवीरांना या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
नौदलाच्या दक्षिण कमांडचे प्रमुख, फ्लॅग ऑफिसर व्हाईस ऍडमिरल व्ही श्रीनिवास यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. ख्यातनाम शिल्पकार तसेच पद्मश्री आणि पद्म विभूषण पुरस्कार प्राप्त सुदर्शन साहू हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ख्यातनाम क्रीडापटू तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त एम सुरंजय सिंह आणि विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे मान्यवर पासिंग आऊट परेडला उपस्थित होते. या कार्यक्रमाला अग्निवीरांचे कुटुंबीयही उपस्थित होते. नौदलाचा 16 आठवड्यांचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल हे दीक्षांत संचलन आयोजित करण्यात आले होते.
जागतिक सुरक्षा परिस्थितीत नवीन आव्हाने समोर येत असून, अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अग्निवीरांनी आपल्याला मिळालेल्या प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करायला हवा, असे नौदल प्रमुखांनी अधोरेखित केले. देशाची सेवा पूर्ण सामर्थ्याने आणि सन्मानाने करताना त्यांनी नौदलाच्या कर्तव्य, सन्मान आणि धैर्य या मूलभूत मूल्यांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत अग्निवीरांना पदक आणि चषक प्रदान करण्यात आले. तत्पूर्वी, दीक्षांत समारंभात नौदल प्रमुखांनी अंगद डिव्हिजनला सर्वोत्तम कामगिरीसाठीचा चषक आणि शिवाजी डिव्हिजनला उपविजेतेपदाचा चषक प्रदान केला.