ओटावा, (कॅनडा) – घराला लागलेल्या संशयास्पद आगीमध्ये मूळ भारतीय असलेल्या दाम्पत्यासह त्यांच्या १६ वर्षांच्या कन्येचा होरपळून मृत्यू झाला आहे. कॅनडातील ओन्टारिओ प्रांतात ७ मार्चला ही घटना घडली.
मात्र या मृतांची ओळख शुक्रवारी पटली, असे पोलिसांनी सांगितले. जळालेल्या घरामध्ये सापडलेल्या मृतदेहांच्या अवशेषांच्या तपासणीच्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात आली, असे वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
राजीव वारिकू (वय ५१), शिल्पा कोथा (वय ४७) आणि महक वारिकू (वय १६) अशी मृतांची नावे आहेत. ते रहात असलेल्या घराला आग लागून त्यात या तिघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिनांक ७ मार्च रोजी रात्री १.३० वाजता ब्राम्पटन या रहिवासी भागातील बिग स्काय वे आणि वॅन किर्क ड्राइव्ह या परिसरातील पोलिसांना पाचारण केले गेले. हा परिसर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता.
अग्निशामक दलाने ही आग विझवली आणि आगीच्या कारणांचा तपास केला. मात्र तपासणीच्यावेळी पूर्ण जळून गेलेले ३ मृतदेह मिळाले.
ही आग अपघाताने लागली नसावी, तर लावली गेली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर कुटुंबातील तिघांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला असावा, याचाही शोध घेतला जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले. शेजाऱ्यांकडे चौकशी करून अधिक माहिती गोळा केली जात आहे.