Dhaka Premier League 2021 : आयोजकांनाच आला स्पर्धेचा “विट’

वादग्रस्त घटनांनी ढाका लीग चर्चेत

ढाका – माजी कर्णधार शकीब अल हसन याने केलेल्या गैरवर्तनाची घटना ताजी असतानाच ढाका प्रीमिअर लीगमधील एका खेळाडूने अन्य खेळाडूला चक्‍क वीट फेकून मारल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन केलेल्यांनाच आता स्पर्धेचा विट आल्याचे दिसून येत आहे.

बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला क्रिकेटपटू शब्बीर रहमान याने गंभीर शिस्तभंग केला आहे. डीएसओएस क्‍लब विरुद्ध शेख जमाल धनमंडू क्‍लबमधील सामन्यात हा प्रकार घडला. खरेतर रहमान ही लढत खेळत नव्हता. त्याच्यावर शेख जमाल संघाचा फिरकी गोलंदाज इलियास सनीला वीट फेकून मारल्याचा आरोप आहे. रहमानने यावेळी इलियासला वर्णद्वेषी टीकाही केली. या प्रकरणात शेख जमाल संघाने ढाका मेट्रोपोलीस (सीसीडीएम) क्रिकेट समितीला विनंती करून रहमानवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बांगलादेश क्रिकेट मंडळानेही या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. शकीब अल हसनच्या घटनेनंतर आता ही घटनाही घडल्यामुळे मंडळाने या लीगसाठी नव्याने कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पुढील काळात कोणत्याही खेळाडूकडून असे प्रकार होऊ नयेत यासाठीही कठोर नियमावलीही तयार करणार असल्याचे म्हटले आहे.

इतिहासही वादग्रस्त

2019 सालच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत बांगलादेशचे प्रतिनिधित्व केलेल्या शब्बीर रहमानने यापूर्वी अनेकदा गैरवर्तन केले आहे. 2017 साली एका प्रथमश्रेणी सामन्यात एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. तसेच 2018 साली त्याने सोशल मीडियावरही एकाला शिवीगाळ केली. त्यावेळी आयसीसीने त्याच्यावर सहा महिन्यांची बंदीही घातली होती. 2019 साली बांगलादेशचा खेळाडू मेहदी हसन मिराजशीदेखील त्याचे वाद घडले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.