क्रिकेट काॅर्नर : कारणे नकोत, कामगिरी करा

– अमित डोंगरे

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शुक्रवारपासून सुरू झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम कसोटी सामन्यात खेळत आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी काही गोष्टी अशा घडल्या आहेत की त्या आजपर्यंत भारतीय संघाबाबत कधीही घडल्या नाहीत.

खरेतर जेव्हा भारतीय संघ परदेशात खेळण्यासाठी जातो त्यावेळी प्रतिस्पर्धी संघ माध्यमांमध्ये सातत्याने वेगवेगळी मते व्यक्‍त करतो. परदेशातील सोकॉल्ड समीक्षक आपल्या अकलेचे तारे तोडतात आणि भारतीय संघावर मीडिया ट्रायल करत दडपण वाढवण्याचा प्रयत्न करतात. या सामन्याबाबत मात्र चित्र वेगळेच आहे. आपल्याच भारताचे समीक्षक, खेळाडू ते देखील सध्याच्या भारतीय संघात आहेत तेच खेळाडू समीक्षा करताना दिसत आहेत. त्यांच्या हाताला हात लावून भारतीय समालोचक व माजी खेळाडूही मम म्हणत आहेत.

कोहलीच्या संघातील संयमी व तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजारा यानेच हा सामना जिंकणे भारतीय संघासाठी अत्यंत कठीण असल्याचे सांगितले तेव्हा युद्धाच्या आधीच शस्त्रे मॅन केल्याचे दिसून आले. याला काय म्हणावे. आपल्या कामगिरीचा दर्जा त्याला समजला आहे की, करोनाचा लॉकडाऊन व बायोबबलमध्ये राहावे लागत असल्याचा परिणाम अशी निराशाजनक मानसिकता तयार होण्यामागचे मुख्य कारण आहे का. आकाश चोप्रा आणि संजय मांजरेकर यांनीही भारतीय संघाच्या यशाबाबत शंका व्यक्‍त केली आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे. मात्र, इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते की खेळाडूंनी हा सामना जिंकण्यासाठीच खेळला पाहिजे.

इंग्लंडमध्ये दाखल झाल्यापासून आम्हाला सराव सामने खेळायला मिळाले नाहीत. येथे आल्यावर विलगीकरणात राहावे लागल्याने नेट सरावही फारसा मिळाला नाही. येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. खेळपट्टी देखील आशियाई खेळपट्ट्यांप्रमाणे नाही. त्यातच पावसाचे सावट असल्याने आमच्या फलंदाजांना नेटाने स्विंगचा सामना करणे जमले नाही. ही व अशी कित्येक कारणे कदाचित कोहली व मुख्य. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी निश्‍चित करून ठेवली असावीत अशीच देहबोली खेळाडूंची वाटत आहे. त्याला पुरवणी म्हणून आणखी एक कारण मिळाले आहे.

या सामन्यात सहभागी होण्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळला त्यामुळे त्यांना येथील वातावरणाशी तसेच खेळपट्टीशी जुळवून घेणे सोपे ठरले. आता ही कारणे एखाद्या कमकुवत संघाने दिली तर कदाचित मान्य केली जातील पण जो संघ कसोटी विश्‍वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात खेळत आहे त्यानी ही कारणे सांगू नयेत. नाचता येईना अंगण वाकडे म्हणतात अशी टिंगल केली जाईल. त्यामुळे या सामन्यात खेळताना कारणे नकोत कामगिरीच सिद्ध कराययला हवी.

भारताकडे जागतिक दर्जाचे व अनुभवी फलंदाज आहेत, जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत, परदेशी संघांनाही लाजवतील, असे क्षेत्ररक्षक आहेत मग प्रत्यक्ष कामगिरीदेखील जागतिक दर्जाची झाली पाहिजे त्याला अपयशाच्या कारणांचे कव्हर नको.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.