पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने विद्यार्थ्यांना संगणक टायपिंगचे प्रशिक्षण देत असलेल्या एका इन्स्टिट्यूटलाच लघुलेखन परीक्षा घेण्याचा ठेका दिला आहे. परीक्षेचे केंद्र राहणारे हे टायपिंग इन्स्टिट्यूट राज्यभरात विविध परीक्षा केंद्रांवर लघुलेखन परीक्षा घेणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत संबंधित टायपिंग इन्स्टिट्यूटला सहभागी होता यावे यासाठी परीक्षा परिषदेने संबंधित इन्स्टिट्यूटला निविदा प्रसिद्ध झाल्याच्या दिवशीच घाईघाईने अनुभव प्रमाणपत्र दिले.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव व शिक्षण आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. यामुळे टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहारानंतर आता लघुलेखन परीक्षेच्या निमित्ताने परीक्षा परिषद पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडून शासकीय प्रमाणपत्र ऑनलाइन लघुलेखन, संगणक सेवा कार्य आणि सेवा विषयक परीक्षेच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. निविदा तयार करताना के.के. कॉम्प्युटर अकॅडमीला हे काम कसे मिळेल यादृष्टीने अटी आणि शर्ती तयार करण्यात आल्या. कामे केलेली नसतानाही त्याचे अनुभव प्रमाणपत्र के. के. अकॅडमीला देणे, संस्थाचालकालाच परीक्षा घेण्याचे अधिकार देणे या बाबी संशयास्पद आहेत.
के. के. कॉम्प्युटर अकॅडमीचे प्रोपरायटर हेच संतोष कॉम्प्युटर टाइपरायटिंग इन्स्टिट्यूटचेही प्रोपरायटर आहेत. त्यामुळे टायपिंग इन्स्टिट्यूटवरच परीक्षेची जबाबदारी देणे हा मोठा घोटाळाच आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आशुतोष पिंगळे यांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे.
अहवाल सादर करावाच लागणार –
ऑनलाइन लघुलेखन परीक्षेच्या निविदा प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार आमदार देवेंद्र भुयार यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेण्यात आली असून स्वयंस्पष्ट अहवाल शासनास तात्काळ सादर करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकारी मृणाली काटेंगे यांनी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांना बजाविले आहेत.
आशुतोष पिंगळे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत शिक्षण आयुक्तालयातील शिक्षण उपसंचालक डॉ.श्रीराम पानझाडे यांनी राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश बजाविलेले आहे.
निविदा प्रक्रिया पारदर्शकच –
देशात पहिल्यांदाच लघुलेखन परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची चाचपणी डिसेंबर २०२३ मध्ये करण्यात आली. ती यशस्वीही झालेली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कॉपीसह अन्य गैरप्रकारांना थाराच देण्यात आलेला नाही. यामुळे आता लघुलेखन परीक्षा ऑनलाइनच घेण्याचा निर्णय झालेला आहे. येत्या जूनमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार असून ६ हजार ७०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
या परीक्षेच्या कामकाजाचा ठेका देण्यासाठी पारदर्शकपणे निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. परीक्षा परिषदेची प्रतिष्ठा उंचाविण्यासाठी व आर्थिक बचत व्हावी यासाठी प्रामाणिकपणे कामकाज करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.