नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या जाहीरनाम्याचा आधार घेत कॉंग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोफत वीज, मोफत रेशन आणि बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन देऊन कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला, असा टोला ‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगाविला.
उत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा जिंकलेल्या आप नेत्यांशी संवाद साधताना केजरीवाल यांनी आपल्या जाहीरनाम्याबाबत भाष्य केले. केजरीवाल म्हणाले, देशाच्या राजकारणात काही बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आप यशस्वी झाले आहे. कारण इतर पक्ष देखील आता शिक्षण आणि आरोग्य या मुद्द्यांवर मते मागत आहेत. जर तुम्ही कर्नाटक निवडणुकांवर नजर टाकल्यास कॉंग्रेस पक्ष आमच्या जाहीरनाम्यावर विजयी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात राजकीय पक्ष जात आणि धर्माच्या आधारे मत मागायचे. परंतु, आप पक्षाने सर्वात आधी मोफत वीज, बेरोजगारी भत्ता, मोफत रेशन आणि महिलांना 1,000 रुपये देऊ असे जाहीर केले होते. आता हिच आश्वासने भाजपही देत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये दोन टप्प्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपने चांगले यश मिळविले आहे. ‘आप’च्या विजयी उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवार अल्पसंख्याक समुदायाचे आहेत.