फॉर्म्युला बदलला; भाजपच्या उमेदवाराचा पराभव
लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी सोमवारी (दि. 2) झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक सुधीर दत्तात्रय शिर्के हे विजयी झाले. शिर्के यांना 14 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपाच्या गौरी गणेश मावकर यांना 12 मते मिळाली.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. त्यांना सहायक म्हणून मुख्याधिकारी रवी पवार यांनी कामकाज पाहिले. सुधीर दत्तात्रय शिर्के यांना नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, देविदास कडू, ब्रिंदा गणात्रा, रचना सिनकर, राजू बच्चे, दिलीप दामोदरे, आरोही तळेगावकर, पूजा गायकवाड, संध्या खंडेलवाल, सुधीर शिर्के, सुवर्णा अकोलकर, संजय घोणे, मंदा सोनवणे या 14 जणांनी मतदान केले.
तर गौरी मावकर यांना शादान चौधरी, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, सुनील इंगूळकर, शिवदास पिल्ले, माणिक मराठे, भरत हारपुडे, अर्पणा बुटाला, जयश्री आहेर, गौरी मावकर, सेजल परमार, अंजना कडू अशी 12 जणांनी मतदान केले.
लोणावळा नगरपरिषदेची चार वर्षांपूर्वी सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर नगरपरिषदेत भाजपा, कॉंग्रेस, आरपीआय व अपक्ष यांची आघाडी तयार झाली होती, तर शिवसेना व अपक्ष विरोधी बाकावर बसले होते.
दरम्यानच्या काळात भाजपात पक्षीय मतभेद झाल्याने चार नगरसेवकांनी विरोधी बाकावर बसणे पसंत केले. आजच्या निवडणुकीत चार वर्षांपूर्वी ठरलेल्या फॉर्म्यूल्यानुसार भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर शिर्के यांना मतदान करावे, असा व्हिप भाजपाचे गटनेते देविदास कडू यांनी बजावला होता. मात्र कॉंग्रेस उमेदवाराच्या विरोधात भाजपाच्या नगरसेविका गौरी मावकर यांनी अर्ज भरला.