भोपाळ – मतदान प्रक्रियेत कोणताही घोळ राहु नये म्हणून मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मधून ज्या स्लीपा येतात त्या स्लीपा मतदारांच्या हवाली करण्यात याव्यात अशी मागणी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रात मतदान केल्यानंतर आपण ज्या चिन्हावर मतदान केले आहे ते तेथेच रजिस्टर झाले आहे की नाही याची खात्री व्हीव्हीपॅट यंत्रातील स्लीपवरून होत असते.
दिग्विजयसिंह यांनी निवडणूक आयोगाला लिहीले आहे की, आमची एकच विनंती आहे, कृपया व्हीव्हीपीएटी स्लिप आम्हाला स्वतंत्रपणे द्या, जी आम्ही एका वेगळ्या मतपेटीत ठेवू. मोजणीपूर्वी, कोणत्याही 10 मतपेटीतील मतांची मोजणी करा आणि त्यांच्या निकालांसोबत त्यांची जुळणी करा.
यात निवडणूक आयोगाला काय अडचण आहे? आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की ही बाब गांभीर्याने घेऊन देशातील लोकशाही वाचवावी, असे दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस राज्यातील 230 पैकी किमान 150 जागांवर विजय मिळवेल, असा दावाही दिग्विजयसिंह यांनी केला आहे.