मुंबई – सुप्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले आहे. यासोबतच अमृता आणि इमरोजची अनोखी प्रेमकहाणीही संपुष्टात आली आहे.
इमरोज यांचे वयोमानामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते घरी आले होते. मात्र आज, शुक्रवारी त्यांनी मुंबईतील कांदिवली येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
इमरोज यांना इंद्रजित सिंग या नावानेही ओळखले जात होते. प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम यांच्यासोबतच्या नात्यामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. अमृता आणि इमरोजची प्रेमकथा ही काही खास प्रेमकथांपैकी एक आहे.
दोघेही 40 वर्षे एकमेकांसोबत राहत होते, पण त्यांनी कधीच त्यांच्या नात्याला लग्नात बांधण्याचा प्रयत्न केला नाही. अमृता त्यांना प्रेमाने जीत म्हणायच्या. अमृताच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात इमरोज तिच्यासोबत सावलीसारखे होते.