नवी दिल्ली – इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चांना जेडीयू या त्यांच्या पक्षाने पूर्णविराम दिला. इंडियाच्या स्थापनेत नितीश यांनी महत्वाची भूमिका निभावली. त्या आघाडीच्या स्थापनेमुळे ते पूर्ण समाधानी आहेत, असे जेडीयूने म्हटले. इंडियाची बैठक नुकतीच दिल्लीत झाली. त्यानंतर नितीश यांच्याविषयीच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या. इंडियाचे संयोजक बनवण्यात न आल्याने नितीश नाराज झाले. त्यातून त्यांनी बैठकीनंतरची पत्रकार परिषद टाळली, असा दावा संबंधित बातम्यांमधून करण्यात आला. तो दावा नितीश यांचे निकटवर्तीय आणि जेडीयूचे नेते संजयकुमार झा यांनी पत्रकारांशी बोलताना फेटाळून लावला. नितीश यांच्या समवेत झा हेही इंडियाच्या बैठकीला उपस्थित होते. दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमुळे आम्ही चकित झालो. इंडियाच्या बैठकीत अतिशय सलोख्याच्या वातावरणात चर्चा झाली. मी साडेतीन तास तिथे असल्याने अतिशय खात्रीपूर्वक सांगू शकतो, असे ते म्हणाले. नितीश यांना आघाडीचे संयोजकपद हवे असल्याच्या अंदाजांमध्ये कुठले तथ्य नाही. बैठकीत नितीश यांनी काही प्रस्ताव मांडले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीचे जागावाटप जानेवारीपर्यंत निश्चित केले जावे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान उभे करण्यासाठी लवकर प्रचार मोहीम हाती घ्यायला हवी. त्यासाठी जागावाटपानंतर आघाडीतील घटक पक्षांनी किमान समान कार्यक्रम आखावा, अशी भूमिका नितीश यांनी मांडली. बिहारमध्ये कुठले अडथळे नसल्याने जागावाटपाची डेडलाईन आम्ही पाळू. देशभरात तसे घडावे असे आम्हाला वाटते. अर्थात, राज्या-राज्यांमध्ये वेगवेगळी समीकरणे असल्याची कल्पना आम्हाला आहे, असे झा यांनी नमूद केले.