बंगळुरू – कॉंग्रेसच्या हंमागी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांनीच नवीन कॉंग्रेस अध्यक्षांची निवड करावी अशी मागणी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी केली आहे.
प्रियांक म्हणाले की या पदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव घेतले जाते आहे. हे चांगले नाव आहे. मात्र राहुल गांधी अथवा प्रियंका गांधी यांनीच अध्यक्ष पद स्विकारावे अशी पक्ष कार्यकर्त्यांची मागणी आहे कारण त्यांच्या नावाला पक्षात व्यापक सहमती आहे. कोणाला आवडो अथवा न आवडो मात्र या दोघांनी केलेले आवाहन परिणामकारक असते. जेव्हा जेव्हा गांधी हे नाव केंद्रस्थानी नसते तेव्हा तेव्हा पक्षाला काम करणे अशक्य होते हा इतिहास आहे. सगळ्यांना जोडणारे हे नाव आहे.
गांधी कुटुंबाशिवाय आम्ही काम करू शकत नाही असे नाही. मात्र ते सगळ्यांना एकत्र चिकटवून ठेवण्याचे काम करतात आणि त्या कुटुंबाने देशासाठी मोठे बलिदानही दिले आहे. जर हे पद स्विकारण्याची त्यांची तयारी नसेल तर कोणाला अध्यक्ष करायचे हा निर्णय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर सोडून द्यावा. त्यांच्या संमतीने जे नाव पुढे येईल ते पक्षाच्या हिताच्या दृष्टीने सगळ्यांत चांगले असेल.
अशोग गेहलोत यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की गेहलोत हे जादुगार मानले जातात. त्यांचा अनुभव, इतर राज्यांतील नेत्यांशी त्यांचे असलेले संबंध पाहता ते अध्यक्ष म्हणून चांगले वाटत असतील तर ती योग्य निवड आहे. मुकुल वासनिक आणि गुलाम नबी आझाद यांचीही नावे चर्चेत आहेत व या सगळ्यांकडे खूप मोठा अनुभव आहे.