आठही जागांसाठी कॉंग्रेसची तयारी

पुण्यातील विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या आज मुलाखती

पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ शहर कॉंग्रेसनेही पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी आयोजित केल्या आहेत. आठ पैकी किती आणि कोणत्या कॉंग्रेसच्या वाट्याला येणार आहे, हे अद्याप निश्‍चित नसले तरी आठही जागांसाठी या मुलाखती होणार आहेत.

आठ मतदारसंघासाठी इच्छुकांचे 53 अर्ज पक्षाकडे दाखल झाले आहेत. यासाठी निरीक्षक म्हणून माजी खासदार जयवंतराव आवळे आणि प्रदेश पदाधिकारी राजेश शर्मा यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून या मुलाखती होणार आहेत.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघासाठी 6 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तर शिवाजीनगर विधानसभा मतदार संघासाठी सर्वाधिक 12 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये माजी महापौर, उपमहापौरांसह आजी, माजी नगरसेवकांचा समावेश आहे. कोथरूड आणि पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी तीन अर्ज दाखल झाले आहेत.

यामध्ये विद्यमान नगरसेवकांचा समावेश असून, अन्य पक्षातून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याचाही समावेश आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात पाच जण इच्छुक असून यामध्येही माजी मंत्र्यांच्या चिरंजीवांचा समावेश आहे. याशिवाय माजी नगरसेवकांनीही अर्ज दिला आहे.

कॅन्टोन्मेन्ट विधानसभा मतदारसंघात सात जण इच्छुक असून, त्यामध्येही माजी आमदार आणि मंत्री स्वत: आणि त्यांचा मुलगाही इच्छुक आहे. याशिवाय विद्यमान नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनीही अर्ज दाखल केले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातून 11 जणांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यामध्ये माजी महापौर, महापालिकेतील विद्यमान गटनेते यांच्यासह काही नगरसेवकांनीही अर्ज दाखल केले आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यांतर्गत येणार आहे. त्यामुळे त्यासाठी ज्या 6 जणांनी इच्छा व्यक्त केली आहे, त्यांच्या मुलाखती जिल्ह्याच्या मुलाखतींवेळीच घेतल्या आहेत.

ज्या इच्छुक उमेदवारांना मुलाखतीला येताना शक्‍तिप्रदर्शन करायचे आहे, त्यांना आम्ही अडवणार नाही. कारण या निमित्ताने कार्यकर्त्यांनाही उत्साह येत असतो. सकाळी 11 वाजता मुलाखती सुरू होणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्हीसाठी त्या होणार आहेत.
– रमेश बागवे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.