जम्मू काश्‍मीरमध्ये नवे आदेश लागू; सुरक्षा बैठकांनी घेतला वेग

 खबरदारीच्या उपाय योजनांची तयारी सुरू

श्रीनगर: जम्मू काश्‍मीरच्या विशेष दर्जाबाबत केंद्र सरकारकडून काही धाडसी निर्णय घेतले जाण्याच्या शक्‍यतेने आज प्रशासनाकडून नव्याने आदेशांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे काश्‍मीर खोऱ्यातील राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील मशिदी, त्याच्या व्यवस्थापन समित्यांची माहिती 5 विभागीय पोलिस अधिक्षकांकडून मागवण्यात आली आहे. याशिवाय या व्यवस्थापन समितीतील सदस्यांची विचारधारा कोणती आहे, याचाही तपशील मागवण्यात आला आहे. त्याशिवाय टॅक्‍सींची संख्या, पेट्रोलपंपांची संख्या आणि या टॅक्‍सीच्या क्षेत्राची माहितीही गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांसाठीचे हे आदेश गोपनीय आहेत. पण सोशल मिडीयावर ते व्हायरल झाले आहेत. हे आदेश अद्याप आपल्याला मिळालेले नाहीत, असे काही पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने काश्‍मीरमध्ये केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलांच्या 100 तुकड्या तैनात केल्या आहेत.

विभागीय पोलिस अधिक्षकांना देण्यात आलेल्या नव्या आदेशांमुळे जम्मू आणि काश्‍मीरमधील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. यामुळे जम्मू काश्‍मीरच्या विशेष दर्जाबाबत काही धाडसी निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जाण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. मात्र विशेष दर्जाबाबत काही फेरबदलाला प्रमुख राजकीय पक्षांकडून जोरदार विरोध होण्याचीही शक्‍यता आहे.

विविध पातळ्यांवर खबरदारीच्या सुरक्षा बैठकांनी वेग घेतला आहे. बडगाव येथील रेल्वे सुरक्षा दलांनी किमान चार महिन्यांचा धान्य साठा करण्याची सूचना कर्मचाऱ्यांना केली आहे. वाहनांमधील इंधन पूर्ण भरलेले असावे इथपासून 7 दिवसांच्या पिण्याचे पाणीही साठा करून ठेवण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत.

जम्मू काश्‍मीरमध्ये ठिकठिकाणी सुरक्षा बंदोबस्त वाढवला जात आहे. शहरांमध्ये तसेच पर्यटक सातत्याने येत असलेल्या ठिकाणी बंकरही उभारण्यात आले आहेत. या बंदोबस्ताबाबत जम्मू काश्‍मीरच्या राज्यपालांच्या गृह विभागाच्या सल्लागारांकडून कोणत्याही शक्‍यतेला नाकारलेले नाही. सोशल मिडीयावरच्या अफवेमुळे ही तयारी असू शकते असे के. विजय कुमार यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)