मुंबई :- विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर कॉंग्रेसतर्फे विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करायचे हा निर्णय कॉंग्रेसच्या हायकमांडकडे अडकलेला होता. अखेर दिल्ली हायकमांडने वडेट्टीवार यांच्यांकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपावली आहे. मात्र विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच असणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर कॉंग्रेसला विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद मिळणार यावरती शिक्कामोर्तब झाले. कॉंग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्याला विरोधी पक्षनेता करण्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर दुसऱ्या फळीतील विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यात संग्राम थोपटे यांनी 30 आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिल्लीमध्ये पाठवले. त्यामुळे आमदारांचे समर्थन लक्षात घ्यायचे की आणखी काही निर्णय घ्यायचा हा प्रश्न निर्माण होता. परंतु अखेर थोपटेंच्या सह्यांच्या ताकदीला न जुमानता हायकमांडकडून वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
2019 च्या निवडणुका झाल्या त्यावेळी कॉंग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर होता. पण शिवसेना, राष्ट्रवादीत झालेल्या फुटीमुळे कॉंग्रेस आपोआप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. संख्येच्या जोरावर विरोधी पक्षनेते पदही कॉंग्रेसला मिळाले.
प्रदेशाध्यक्ष -विरोधी पक्ष नेते विदर्भाचे
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भातले आहेत आणि आता विरोधी पक्षनेते देखील विदर्भातीलच झाले आहेत. पटोले हे ओबीसी नेते आहेत आणि वडेट्टीवार सुद्धा ओबीसी नेते आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पद एकाच समाजातून हे सामाजिक समीकरण हा निर्णय घेताना कॉंग्रेसने समोर ठेवल्याचे पाहायला मिळते.
यापूर्वी विरोधीपक्षनेतेच गळाला….
विधीमंडळात पावसाळी अधिवेशन संपायला अवघे तीन दिवस उरलेले असताना विरोधी पक्षनेता ठरलेला आहे. महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये जे कोणी विरोधीपक्ष नेते झाले. ते भाजपच्या गळाला लागून सत्ताधारी पक्षांत जाऊन बसलेले पाहायला मिळतात. त्यामध्ये एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते आणि ते आता सत्तेत आहेत.