Lok Sabha Election 2024 | कॉंग्रेसमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या कार्यकारीणीची उद्या म्हणजे मंगळवारी बैठक होणार असून त्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या पक्षाच्या घोषणापत्रावर चर्चा करून त्याला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली १९ आणि २० तारखेला बैठक होणार आहे. त्यात १९ एप्रिलपासून सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावावरही शिक्कामोर्तब केले जाईल.
पक्षाकडून या घोषणापत्रात मतदारांना न्यायासाठी पाच गॅरेंटी देण्यात आल्याची माहिती कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली. भागीदारी न्याय, किसान न्याय, नारी न्याय, श्रमिक न्याय आणि युवा न्याय या पाच हमींवर निवडणूक लढण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. यातील बहुतेक मुद्द्यांवर खर्गे आणि राहुल गांधी यांनी अगोदरच पक्षाची भूमिका मांडली आहे.