कॉंग्रेस विधिमंडळ नेता व गटनेता निवड बारगळली

पाठिंबा पत्रावर आमदारांच्या सह्या घेऊन संपली बैठक

मुंबई : कॉंग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित 44 आमदारांची शुक्रवारी दुपारी विधिमंडळातील पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत विधिमंडळ नेता व गटनेता निवडीऐवजी सरकार स्थापनेसाठी समर्थन म्हणून सर्व आमदारांच्या पत्रांवर सह्या घेण्यात आल्या.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीने आपला विधिमंडळ गटनेता जाहीर केला असला तरी अद्याप कॉंग्रेसकडून मात्र विधिमंडळ गटनेता व पक्षनेत्याची निवड केलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी गटनेता व पक्षनेत्याची निवड करण्यासाठी सर्व आमदारांची बैठक विधानभवनातील कॉंग्रेस कार्यालयात आयोजित केली होती.

या बैठकीला कॉंग्रेसचे दिल्लीतील निरीक्षक उपस्थित असणे अभिप्रेत होते. मात्र, ज्येष्ठ नेते वेणुगोपाल रेड्डी, राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव अहमद पटेल हे या बैठकीला अनुपस्थित होते.

विधिमंडळात कॉंग्रेसने दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी झालेल्या चर्चेचा सर्व तपशील आपल्या आमदारांना सांगितला. तसेच पुढच्या तीन दिवसांत सत्तास्थापनेसाठी काय घडामोडी करायच्या आहेत, यासंदर्भातली माहिती दिली. यावेळी कॉंग्रेसच्या आमदारांनी शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्यास सहमती असल्याचे सांगितले.

पुढच्या दोन दिवसात महाविकास आघाडीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळे सर्व आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश दिले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. कॉंग्रेसचा विधिमंडळातील गटनेता आणि विधीमंडळ नेता निवडी संदर्भात आजच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याची नंतर प्रक्रिया राबवण्यात येईल, असे कॉंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here