सातारा – सातारा तालुक्यातील आकले येथे वादळी वारे व पावसात एका गरीब कुटुंबाचे घर उध्दवस्त झाले असून हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटात वादळी वार्यासह झालेल्या पावसात आकले येथील शेतकरी शेतकरी रामचंद्र भिकू सुतार (वय 95) व हरिश्चंद्र रामचंद्र सुतार (वय 58) यांचे घरच उध्दवस्त झाले आहे. वादळी वार्यात घराचे छप्पर उडून गेले असून भिंतीचीही पडझड झाली आहे. या घटनेत घरातील सर्व संसारपयोगी साहित्यासह अन्न, धान्य भिजून मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये एक गाय देखील जखमी झाली असून या घटनेत सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, मंगळवारी या नुकसानीची पाहणी करण्यात आली असली तरी या कुटुंबाला शासन व समाजाने आधार देण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या संकटाने हे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे.