मांढरदेव – काल (सोमवारी) वाई परिसरात झालेल्या मुळधार पावसामध्ये पांडेवाडी येथील घराची भिंत कोसळून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू तर दोघेजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. वाई परिसरात वादळीवाऱ्यासह मुसळदार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. विजेचा कडकडाटामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला. तर काही ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्यामुळे मोठया दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये पांडेवाडी गावामध्ये घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तेथील नामदेव गणपती शिंदे (वय 75) यांचा जागीच मृत्यू झाला. आणि त्यांची सून व नातू गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमध्ये सदर कुटुंबाच्या घराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्या कुटुंबातील जखमी व्यक्तींना उपचारासाठी आर्थिक मदत तसेच घराच्या नुकसानीचा पंचनामा करून त्या कुटुंबास नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.