मुंबई – कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारमधील सहभागी पक्ष आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या टीपण्णीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी भेट घेतली. पटोले यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा पक्षाने केला. त्यानंतर ही भेट घेण्यात आली.
आपल्या हालचालींवर राज्य सरकार लक्ष ठेवत असून कॉंग्रेसच्या घोडदौडीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना घाबरले आहेत, अशी टीका पटोले यांनी केली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या स्थीरतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळातील सदस्य आणि कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि पक्षाचे नेते एच के पाटील यांनी पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओक येथे जाऊन पवार यांची भेट घेतली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने या भेटीचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रकाशित केले. त्यात ही सदिच्छा भेट असल्याचे नमूद केले. बाळासाहेब थोरात यांनी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सरकारमधील पक्षात कोणतीही चढाओढ नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.