मंगळुरु – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांचे आज निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. यावर्षी जुलै महिन्यामध्ये व्यायाम करताना फर्नांडिस जामिनावर कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांच्यावर मंगळुरु येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. उपचारांदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
युपीए-१ सरकारमध्ये त्यांनी वाहतूक, रस्ते आणि महामार्ग, श्रम आणि रोजगार मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. फर्नांडिस हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जायचे.
ईशान्य बंडखोरांचा प्रश्न गुंतागुंतीचा बनला असताना त्यांनी चर्चेतून वाटाघाटी केल्या होत्या. फर्नांडिस कोणतीही जबाबदारी दिली तरी तत्परतेने पार पाडत असत. हीच त्यांची काँग्रेस पक्षातील ओळख बनली होती. पक्षांतर्गत कलह उफाळून आल्यानंतर त्यांनी अनेकदा चर्चेतून मार्ग काढले.
१९८० मध्ये फर्नांडिस कर्नाटकातील उडुपी मतदारसंघातून प्रथम लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांची ५ वेळा लोकसभेवर निवड झाली. लोकसभा निवडणुकांतील पराभवानंतर १९९९ मध्ये काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर घेतले होते.
फर्नांडिस हे भारतीय नृत्य प्रकार कुचीपुडी आणि यक्षगण यांमध्ये देखील निपुण होते.