पुणे(प्रतिनिधी) – प्रेमसंबंध असताना प्रियेसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा प्रियकराने पोटात चाकू भोकसून खून केल्याची घटना पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे हद्दीत रविवारी रात्री दहा वाजण्याचे सुमारास घडली. सपना दिलीप पाटील (32-,रा.धनकवडी,पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर राम गिरी (35-,मु.रा.परभणी) यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत भारती विद्यापीठ पोलीसांकडे संजीवनी दत्ता देवकर (29) हिने पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. संजीवनी देवकर आणि सपना पाटील या दोघी बहिणी आहेत. त्या रिलायन्स मार्ट मध्ये काम करत होत्या. तसेच धनकवडीतील बालाजीनगर परिसरात राहण्यास आहेत.
रविवारी रात्री साडेआठ वाजण्याचे सुमारास सपना आणि राम गिरी हे दोघे जेवणाकरिता हॉटेल मध्ये गेले होते. जेवण केल्यानंतर ते रात्री दहा वाजण्याचे सुमारास घरी परतत असताना, पुणेकडून साताराकडे जाणारे नवीन कात्रज बोगद्याचे सुरुवातीस कोळेवाडी येथे राम गिरी याने कारमध्येच सपनाचे पोटात डावे बाजूस चाकूने भोकसून तीचा निर्घृण खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाला होता.
खुनाची माहिती मिळताच,परिमंडळ दोनचे पोलीस उपआयुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, संगीता यादव यांनी घटनास्थळी भेट दिली याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर करत आहे. ही कारवाई उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे, अंमलदार रविंद्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे,धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ,सचिन गाडे, शिवदत्त गायकवाड, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, मंगेश बराडे, जगदिश खेडकर यांच्या पथकाने केली.
… असा घडला खूनाचा थरार
आरोपी रामगिरी हा आचाऱ्याचे काम करतो. सध्या तो राजगुरुनगर येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. पाच ते सहा वर्षापुर्वी तो रिलायंन्स मार्ट शेजारील हॉटेलमध्ये कामाला होता. तेव्हा सपना दुपारच्या सुट्टीमध्ये तेथे जेवायला जात होती. या वेळी दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र मागील पाच ते सहा महिण्यांपासून त्यांच्यात वाद होत होते.
रविवारी रात्री तो मित्राला सोबत घेऊन मित्राच्या आयटेन कारमधून सपनासह जेवायला चालला होता. नव्या कात्रज घाटात बोगद्याजवळ त्यांची गाडी आली असता, त्यांच्यात वाद सुरु झाला. तेव्हा त्याने तीला घाबरवण्यासाठी आणलेला नवीन चाकू रागाच्या भरात तीच्या पोटात खुपसला. यानंतर तो गाडीतून पळून गेला. त्याच्या मित्राने तातडीने रुग्णवाहिकेस फोन करुन बोलावून घेतले.
मात्र रुग्णवाहिका रस्त्यात बंद पडल्याने थोड्याच अंतरावरुन त्याने रिक्षातून सपनाला भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान आरोपी रामगिरीने सपनाची बहिणी संजीवनीला फोन करुन सपनाचा खून केल्याची खबर दिली. तीने रुग्णालयात धाव घेत पोलिसांना खबर दिली. सपनाचा फोन रामगिरीकडेच होता, त्याच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तो भारती हॉस्पिटल परिसरातच फिरत असल्याचे आढळले. त्यानूसार त्याला जेरबंद केले.