नवी दिल्ली :- सीमा विवादावर भारत आणि चीन यांच्यात एकमत झाले आहे का, गेल्या नोव्हेंबर मध्ये बालीत झालेल्या चर्चेत केवळ सौजन्याचीच चर्चा झाली आहे काय असा प्रश्न कॉंग्रेसने आज केंद्र सरकारला विचारला आहे.
लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक येथून चिनी सैन्य आता मागे घेणार का, असा सवालही कॉंग्रेसतर्फे आज सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारला केला आहे.
नोव्हेंबर 2022 मध्ये बाली येथे G20 बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात केवळ सौजन्याची देवाणघेवाण झाल्याचा दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने काल केला होता. त्या पार्श्वभूमीवर रमेश यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी यांच्यात बाली येथे महत्वपुर्ण विषयावर सहमती झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ही सहमती नेमकी काय आहे असा प्रश्न जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे.
चीन भारतीय हद्दीत घुसले आहे. पण मोदींनी त्यांना क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे चीनचे धाडस वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात जर महत्वाच्या विषयावर सहमती झाली असेल तर ती नेमकी काय आहे हे समजले पाहिजे असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.