नवी दिल्ली – यूट्युबवरून कॉंग्रेस पक्षाचे चॅनेलच डिलिट झाले आहे. हे चॅनल अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती पक्षाच्या वतीने अधिकृतपणे देण्यात आली आहे. त्यात कॉंग्रेसने म्हटले आहे की, आमच्या पक्षाचे इंडियन नॅशनल कॉंग्रेस नावाचे यूट्युब चॅनेल अचानक गायब झालेले दिसते आहे. या मागे काही तांत्रिक कारण आहे की अन्य काही कारण आहे याचा शोध आम्ही घेत आहोत.
या संबंधात गुगल आणि यूट्युब टीमशी आम्ही संपर्क साधत आहोत, असे कॉंग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे. सध्या सरकारकडून विविध कारणाने यूट्युब चॅनेलवर बंदी घालण्याची कारवाई सर्रास पद्धतीने सुरू आहे. सरकारच्या विरोधात अपप्रचार करून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्याच्या कारणावरून अलीकडेच 102 यूट्युब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे.
त्यातलाच हा काही प्रकार आहे किंवा कसे याचीही माहिती घेतली जात आहे. आम्ही लवकरच परत येऊ, अशी आम्हाला आशा आहे असेही कॉंग्रेस पक्षाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नमूद केले आहे.