कॉंग्रेसला मुहूर्त काही सापडेना; अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर चर्चेचे गुऱ्हाळ

नवी दिल्ली – एकीकडे देश करोनाच्या तावडीत सापडला आहे. कोरोनामुळे जनसमुदायाला कुणीच वाली उरला नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. तर दुसरीकडे देशातील प्रबळ विरोधी पक्षांला साधा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याचे आजच्या बैठकीवरून स्पष्ट झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्दयावर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. मात्र पुन्हा एकदा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे एकमत झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मात्र कॉंग्रेस पक्षच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बैठकीमध्ये फक्त निवडणूकीवर चर्चा झाली असल्याचे सांगितले. यामुळे नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत सोनिया गांधी याच अध्यक्षपदी कायम राहतील.

कॉंग्रेसचे नवीन अध्यक्ष निवडण्यावरुन कॉंग्रेस वर्किंग कमिटीमध्ये (सीडब्ल्यूसी) एकमत नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी झालेल्या सीडब्ल्यूसीच्या बैठकीत अशोक गहलोत, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा या ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीला विरोध केला आहे. कारण करोना महामारीच्या काळात या निवडणुका घेण्याची गरज नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.

यापूर्वी काही अहवालांमध्ये सीडब्ल्यूसीच्या बैठकीत निवडणुकीची तारीख निश्‍चित केली गेली असून 23 जून रोजी नेत्याची निवड होईल असा दावा करण्यात आला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या जोरदार पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली होती. तेव्हापासून कॉंग्रेस नेत्यांचा एक गट पूर्णवेळ व सक्रिय अध्यक्षाच्या निवडणुकीची मागणी करत होता. तर दुसरीकडे गांधी परिवारापासून स्वतंत्र अध्यक्ष करण्याची मागणीही होत आहे.

संबंधित प्रकरणात कॉंग्रेस पक्षातील तब्बल 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून वरपासून खालपर्यंत बदल करण्याची मागणी केली होती. त्यात कपिल सिब्बल, गुलाब नबी आझाद यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. सोनिया यांना लिहलेल्या पत्रात कॉंग्रेसला पूर्णवेळ नेतृत्त्वाची गरज असल्याचे सांगितले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.