#Corona | कोहली, इशांतसह भारतीय खेळाडूंचे लसीकरण

कोविशिल्डचा पहिला डोस भारतात; तर दुसरा डोस घेणार इंग्लंडमध्ये

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना लस घेतल्याचं सांगितलं आहे. कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून करोना लस घेतलेला फोटो पोस्ट केला आहे. लस घेतल्याबरोबर त्याने आपल्या चाहत्यांनादेखील शक्‍य असेल तितक्‍या लवकर लस घेण्याचं आवाहन केलंय.

भारतीय संघाचा तडाखेबाज सलामीवीर शिखर धवन, मुंबईकर अजिंक्‍य रहाणे आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मानंतर विराट कोहलीनेदेखील आज लस घेतली. इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय संघातील खेळाडू करोना लसीचा पहिला डोस घेत आहेत.
आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन खेळाडूंनी लस घ्यावी, अशा सूचना बीसीसीआयने दिल्या आहेत.

7 मे रोजी शिखर धवनने दिल्लीत करोना लसीचा पहिला डोस घेतला. तसंच 8 मे रोजी उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेने मुंबईत लस टोचून घेतली. रहाणे भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तिथे तो 3 महिने भारतीय संघासोबत असणार आहे. दुसरीकडे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्च महिन्यातच करोना लस घेतली होती. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान अहमदाबाद येथे शास्त्री यांनी करोना लस घेतली होती. 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना करोना लस दिली जात होती, त्यावेळी शास्त्री यांनी करोना लस घेतली.

याबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, भारतीय खेळाडूंजवळ आता वेळ आहे. व्यक्‍तिगत पातळीवर ते स्वत: लस घेऊ शकतात. सगळे खेळाडू आपापल्या घरी गेले आहेत. त्यामुळे लस घेणं त्यांच्यासाठी अधिक सोपं झालं आहे. खेळाडूंना फक्‍त कोविशिल्ड लसच घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोविशिल्ड लस घेणं केवळ त्याच क्रिकेटपटूंसाठी आवश्‍यक आहे जे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड मालिकेत भाग घेऊ शकतात. भारतीय खेळाडूंनी कोविशिल्डचा पहिला डोस भारतात घेतल्यास त्यांना दुसरा डोस इंग्लंडमध्ये घेता येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.