विविधा | सदाशिव अमरापूरकर

– माधव विद्वांस

खलनायक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात सतत राहिलेले सदाशिव अमरापूरकर यांचा आज जन्मदिन. त्यांचे मूळ नाव गणेशकुमार दत्तात्रय नरवाडे असे होते. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्‍यातील अमरापूर येथे 11 मे 1950 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे झाले. त्यांचे वडील हे त्या भागातील प्रतिष्ठित शेतकरी होते. त्यामुळे शेत नांगरणे, बैलांना चारा घालणे, मोट चालवणे, गाईचे दूध काढणे, जत्रेत बैल पळविणे या सगळ्या गोष्टीचा अमरापूरकर यांनी बालपणीच अनुभव घेतला होता. 

त्यांच्याकडे 100 शेळ्या चारण्याचे काम असायचे. त्यांच्या आळंदीला राहणाऱ्या आत्याबरोबर त्यांनी तीन-चार वेळेला आळंदी ते पंढरपूर अशी पायी यात्रा केली होती. सुनंदा अमरापूरकर या शाळेपासून असलेल्या मैत्रिणीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना केतकी, सायली आणि रिमा या तीन मुली आहेत. मोठी मुलगी केतकी यांचा प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांच्याबरोबर विवाह झाला आहे.

अभिनयाची आवड त्यांना शालेय जीवनापासूनच होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी “पेटलेली अमावास्या’ या एकांकितेत पहिली-वहिली भूमिका केली होती. नाटकांतील भूमिकांसाठी त्यानी सदाशिव अमरापूरकर हे नाव घेतले. अमरापूरकर यांनी वर्ष 1981 पासून व्यावसायिक रंगभूमीवर “हॅन्ड्‌स अप!’ या मराठी नाटकातून अभिनयास सुरुवात केली.अविनाश मसुरेकर आणि भक्‍ती बर्वे-इनामदार यांनीही या नाटकात भूमिका साकारल्या होत्या. या गाजलेल्या नाटकामुळे अमरापूरकर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले.

रंगभूमीवरील कारकीर्द गाजत असतानाच त्यांना नचिकेत व जयू पटवर्धन दिग्दर्शित “22 जून 1897′ (1979) या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. दिग्दर्शक गोविंद निहलानी अमरापूरकर यांच्या “हॅन्ड्‌स अप’मधील अभिनयाने प्रभावित झाले. “अर्ध सत्य’ या चित्रपटात खलनायक म्हणून हिंदी सिनेमात त्यांनी पहिले पाऊल ठेवले. रामा शेट्टी या भूमिकेसाठी अमरापूरकर यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्यानंतर अमरापूरकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. हिंदी-मराठी-ओरिया-हरियाणी-भोजपुरी-बंगाली-गुजराथी भाषांतील 300 हून अधिक चित्रपटांत काम केले.

वर्ष 1987 मध्ये “हुकूमत’ चित्रपटात त्यांनी धर्मेंद्रबरोबर काम केले. त्यांची संवादफेक, देहबोली, बोलण्याची ढब आणि वेगळेपण प्रभावी असे त्यामुळे जास्त करून खलनायकाची भूमिका मिळत असे. 1991 साली महेश भट्ट दिग्दर्शित “सडक’ या चित्रपटातील त्यांच्या “महाराणी’ नामक तृतीयपंथीयाच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी काही विनोदी भूमिकाही केल्या.

अभिनयाबरोबर त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली होती. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर आदी सामाजिक धुरिणांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. सामाजिक जीवनात काम करणाऱ्या संस्था-संघटनांशीही त्यांचा संबंध होता. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी “लग्नाची बेडी’ या नाटकाचे त्यांनी गावोगावी प्रयोग केले होते. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात तसेच अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. 3 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांचे निधन झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.