गोव्यातील अनेक मतदार यंत्रात बिघाड असल्याची कॉंग्रेस व आपची तक्रार

पणजी – गोव्यातील अनेक मतदार केंद्रांमध्ये व्हीव्हीपॅट मशिन्स आणि मतदार यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी कॉंग्रेस व आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आल्या. गोवा विधानसभेतील कॉंग्रेसचे नेते चंद्रकांत कवळेकर म्हणाले की भाजपकडून या यंत्रात जाणिवपुर्वक बिघाड केले गेले असा आमचा आरोप असून आम्ही या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. कूंकोलिम आणि क्वेपेम मतदार संघातील मतदान यंत्रांच्या जेव्हा चाचण्या घेतल्या गेल्या त्यावेळी अनेक यंत्रावर कोणतेही बटन दाबले तरी भाजपलाच मतदान जात असल्याचे दिसून आले त्यामुळे मोठाच गोंधळ उडाला. ही बाब आम्ही तक्रारीत पुराव्यानिशी नोंदवणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

आम आदमी पक्षाचे दक्षिण गोवा मतदार संघातील उमेदवार एलव्हीस गोमस यांनीही अशीच तक्रार केली. ते म्हणाले की कुंकोलिम मतदारसंघात झालेले प्रत्यक्ष मतदान आणि मतदान यंत्रावर नोंदवले गेलेले मतदान यात मोठी तफावत दिसून आली आहे. ते म्हणाले की मतदान यंत्राच्या चाचणीच्यावेळी आठ वेळा मतदान करण्यात आले पण प्रत्यक्षात त्यावर 17 वेळा मतदान झाल्याचे दिसून आले आहे. संपुर्ण देशभरातील यंत्रांमध्येच असा घोळ असावा अशी आम्हाला शंका आहे. आम्ही ही बाब मतदान अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तेथील मतदानाची प्रक्रिया थांबवली असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.आम्ही खराब मशिन्स बदलल्या असून आता तेथे सर्व काहीं सुरळीत सुरू आहे असे अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.